पवनानगर : पुण्यातील अठरा वर्षीय तरुण पवना धरणात बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.२२) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फांगणे (ता. मावळ) येथे घडली. अद्ववेत सुदेश शर्मा (वय १८, सध्या रा. विमाननगर पुणे, मुळ. रा. दिल्ली) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. अद्ववेत हा सिम्बायोसिस कॉलेज येथे शिक्षण घेत होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्ववेत हा आपल्या पाच महाविद्यालयीन मित्रांसमवेत पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्यानंतर, तो व त्याचे मित्र पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, अद्वैतला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
आपदा मित्र, वन्यजीव रक्षक संस्था आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा व स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.. मात्र, त्याचा मृतदेह सापडला नाही. घटनेची माहिती मयताच्या नातेवाईकांना देण्यात आली असून लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय गाले आणि विजय पवार हे पुढील तपास करत आहेत.