पुणे : पुण्यात लष्कर भागातील पुलगेट येथे पीएमपीएमएलच्या बसने एका तरुणाला धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत तरुणाचा जागीच तडफड तडफडून मृत्यू झाला आहे. यश विष्णू कसबेकर (वय २१, रा. कोंढवा) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
दरम्यान, या मृत्यूला ड्रायव्हरसह संपूर्ण पीएमपीएमएल व्यवस्थापन प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांमधून सूर उमटत आहे. याप्रकरणी बसचालकासह बसस्थानकातील बस वाहतूक नियमनाचे काम करणारे स्टार्टर कर्मचारी यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लष्कर भागातील नागरिक करत आहेत.
१३ जून रोजी सायंकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी बसस्थानकात पीएमपीएमएल विभागाची वातानुकूलित इलेक्ट्रिक (बस क्र. एमएच १२ टीव्ही ३८१४) चा चालक स्वप्निल काळूराम जगताप (३२, रा. पुरंदर) याने भरधाव वेगाने गाडी चालवून कसबेकर याला जोराची धडक दिली.
अपघात झाला आहे हे माहीत असूनही बसचालकाने बस मागे घेतली नाही. तब्बल अर्धा तास गाडीचे चाक तरुणाच्या पोटावरच असल्याने कसबेकर या युवकाचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला.
मात्र, एवढ्या महत्त्वाच्या स्थानकावर बसचे नियमन करणारे कर्मचारी आणि बसस्थानकाचे सुरक्षारक्षक हे त्या ठिकाणी नसल्याने मुलाचा जीव गेला आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशा भावना परिसरातील नागरिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.