– संतोष पवार
पळसदेव (पुणे) : वैशाख वणव्याच्या झळा आणि उन्हाळ्यातील वाढते तापमान यांनी हैराण झालेल्या शेतकऱ्याला मे महिन्याच्या अखेरीस आणि जुनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे.
धरणक्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत संथ गतीने वाढ होत असल्यामुळे बळीराजाची आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे. शेतकरी खरीपातील बाजरी सोयाबीन मका आदि पिकांच्या पेरणीस प्राधान्य देत आहेत. कुटुंबाची वर्षभराची अन्नधान्याची सोय आणि आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून कृषीराजा खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीस प्राधान्य देत असतो.
उजनी धरणातील पाणी पातळीत जरी वाढ होत असली तरी उपयुक्त पाणीसाठा गाठण्यासाठी धरण क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसावरच अवलंबून राहावे लागणार आहे . गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये पावसाविषयी आशा पल्लवित झाल्या आहेत.