पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरण ताजच आहे आणि आणखी एका भीषण अपघातानं पुण्याला धक्का बसला आहे. आता एका आमदाराच्या पुतण्यानं आपल्या गाडीनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवल्याचा प्रकार घडल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आमदाराचा पुतण्या अपघातानंतर घटनास्थळावरून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केल असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याकडून हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले आ. दिलीप मोहिते पाटील?
आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यांनी मद्यप्राशन केलं होतं. या आरोपावर बोलताना दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, “माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस अजूनही चौकशी करतील, पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल्स घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरुणाला माझ्या पुतण्यानं अॅम्बुलन्समध्ये टाकलं आहे. त्यामुळे इतर आरोपांत मला तथ्य वाटत नाही. पण मी अपघातस्थळी नव्हतो. त्यामुळे यासर्व घडामोडींची मी नक्कीच शहानिशा करीन.”