शिरूर: धरणांचे पाणी शिरूर तालुक्यातील भागात सर्वदूर पोहचले. त्यातून ८० टक्के क्षेत्र बागायत क्षेत्र झाले आहे. पाण्यामुळे शिरूर तालु्क्यातील ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलून गेले असले, तरी तालुक्यातील बिबट प्रश्न गंभीर होत चालला आहे. राजकीय नेते मात्र याकडे दुर्लक्ष करीत असून बिबट हल्ल्यातून पशूधनाबरोबरच चिमुकल्यांचा जीव वाचणार का? असा सवाल जाणकारांकडून होऊ लागला आहे.
शिरूर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. त्यातून जेष्ठ नेते आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी चासकमान, डिंबा, वडज, पिंपळगाव जोगा, माणिकडोह यासारख्या धरणांची योजना आणली. त्यातून शिरूर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी धरण आणि कालव्यांच्या माध्यमातून हे पाणी शेतीपर्यंत आणण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे नद्यांवरील कोल्हापूरी बंधारे, कालव्याच्या माध्यमातून पोटचाऱ्यांतून शेतीला पाणी मिळू लागले. अनेकवेळा शिरूर तालुक्यात कमी स्वरूपाचा पाऊस झाला, तरी देखील धरण परिसरात पाऊसाचे साठवलेले पाणी आवर्तनाच्या माध्यमातून शेतीला पुरविण्यासाठी पाट बंधारे खात्याला नियोजन करता आले.
शेतीतून अर्थकारण सुधारले
शिरूर तालुक्यातील शेती ही पावसावर आधारीत होती. पाटबंधारे खात्याचे नियोजन व कोल्हापूरी बंधारे त्यामुळे नद्या ह्या शेतीला नवसंजीवनी म्हणून ओळखू लागल्या. त्यामुळे ऊसासारखे नगदी पीक घेण्याकडे शेतकरी वळाले. डाळींब, केळी, आंबा, चिकू, संत्रा या फळांच्या बागा बहरू लागल्या. बाजरी, गहू, ज्वारी या पिकांबरोबर कांद्यासारखे पिक शेतकऱ्यांना आर्थिक नियोजनात उपयोगी पडू लागली. त्यामुळे साध्या छपरांची घरे नाहिसी झाली. त्यातून शेतशिवारांवर दोन मजली इमारती त्याबरोबरच सुसज्ज बंगले दिसू लागले आहेत. घर तेथे दुचाकी आणि चारचाकी वाहन फिरू लागले आहे. आर्थिक सुधारणा होऊ लागल्याने शेतशिवारावर विविध पिके व त्यातून नवनवीन प्रयोग करताना शेतकरी दिसू लागला आहे.
नद्याकाठी अडोसा: शेतीला पाणी मिळू लागले. मात्र, या पाण्याचे नियोजन करत असताना नद्याकाठी वन्य प्राण्यांना वास्तव करण्यासाठी आडोसा निर्माण झाला. त्यातून बिबट तसेच अन्य प्राणी यांचे वास्तव्य वाढले. ऊसाची शेती वाढल्याने जवळपास १३ महिन्यांचे वास्तव्य आणि आडोसा बिबटला मिळू लागला. त्यामुळे बिबट्यांची संख्या शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली. जंगलाचा नाश झाल्याने बिबट मानव वस्तीत येऊन राहू लागला आहे. पिंपरखेड ( ता. शिरूर ) येथील शाळेत दिवसाढवळ्या बिबट फिरत होता. त्यामुळे विद्यार्थी देखील संकटात सापडले होते. या भागात देखील बिबट प्रश्न गंभीर आहे.
बिबट्यांचे हल्ले:
शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधनावर हल्ले झाले आहेत. त्यातून वनविभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई देखील मेंढपाळ व्यावसायिक व शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे बिबट हल्ला हा विषय शिरूर तालुक्यासाठी महत्वाचा आहे. शिरूर तालुक्याच्या बेट भागात दोन वर्षाच्या मुलीला बिबट्याने अंगणातून उचलून नेल्याचा प्रकार घडला. या भागात सर्वात जास्त मानवावर हल्ले होऊन मृत्यू झाल्याच्या घटना आहेत. नुकतीच शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे दहा वर्षांच्या मुलाला बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे तालुक्यात बिबट हल्ले हा अतिशय गंभीर विषय बनला आहे.
राजकारण्यांना प्रश्नाचे गांभीर्य कधी ?
पुणे जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या भागात बिबट प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न बनला आहे. लोकसभा निवडणुकीअगोदर बिबट प्रश्न सोडवण्यावर राजकारण झाले. मात्र, आजही वाढते बिबट्याचे हल्ले पाहता हा प्रश्न कधी मार्गी लागेल, असा प्रश्न जाणकार नागरीकांकडून विचारला जाऊ लागला आहे.
भविष्यात येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांच्या काळात या प्रश्नांवर नागरिक आवाज उठविणार का ? बिबटपासून चिमुकल्यांचा जीव वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या जातील? वनविभाग यावर कोणता तोडगा काढणार ? शासनस्तरावर याबाबत उपाययोजना आखल्या जातील काय ? मेंढपाळ व्यावसायिक तसेच कुटुंबाच्या संरक्षणासाठी नागरिक काय व्यवस्था करतील? याकडे सध्या लक्ष लागून राहिले आहे.