पुणे : विवाहबाह्य संबंधाची विचारणा केल्याने पोलिसाने चक्क महिला पोलीस पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका वाहतूक पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप हिरामण खंडागळे (वय ३०, रा. देवी लाईन, जेल वसाहत, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी कारागृहात पोलीस शिपाई असलेल्या आरोपीच्या पत्नीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार जून २०१९ पासून सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप खंडागळे हे येरवडा वाहतूक विभागात काम करतात. तर फिर्यादी या कारागृहात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहे. संदीप खंडागळे यांचे कारागृहात पोलीस शिपाई असलेल्या फिर्यादीबरोबर लग्न झाले आहे. त्यांना लग्नात आलेले स्त्रीधन संमतीशिवाय परस्पर बँकेत तारण ठेवले.
दरम्यान, पालघर येथील महिला पोलीस शिपायाबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवले. त्याबाबत विचारणा केली असता फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच फिर्यादी गरोदर असताना बेल्टने मारहाण केली. हा सर्व प्रकार जून २०१९ पासून सुरू होता. फिर्यादीचा पगार स्वतःच्या खात्यावर जमा करून मानसिक व शारीरिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी कारागृहात पोलीस शिपाई असलेल्या महिलेनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संदीप खंडागळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काटे करीत आहेत.