मुंबई: ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केला. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाकडून 28 धावांनी पराभव झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सलग 3 चेंडूत 3 फलंदाज बाद करत हॅट्रिक घेतली. पॅट कमिन्सने घेतलेली हॅट्रिक ही टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सातवी हॅट्ट्रिक आहे. परंतु, तुम्हाला माहित आहे का? की ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने हॅटट्रिक घेणे हे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी चांगला संकेत आहे. असाच योगायोग जवळपास १७ वर्षांपूर्वी टी-२० वर्ल्ड कपमध्ये घडला होता, जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनली होती.
2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कप पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. त्यावेळी विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने बांगलादेशविरुद्ध सलग 3 चेंडूत 3 फलंदाज बाद करत हॅट्रिक घेतली होती. यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. आता टीम इंडियाचे चाहते म्हणत आहेत की, ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरने टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे, हे भारतासाठी चांगले लक्षण आहे.
ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलिया गट-१ मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे समान 2-2 गुण असले तरी ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट चांगला आहे. त्याचवेळी भारतीय संघाने अफगाणिस्तानचा पराभव केला. आता भारत आणि बांगलादेश २२ जूनला आमनेसामने येणार आहेत. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया २४ जूनला आमनेसामने येतील.