पाटणा: सध्या देशात दोन परीक्षांबाबत सर्वाधिक गदारोळ सुरू आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET परीक्षेत हेराफेरीचे आरोप होत असून ती रद्द करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, NEET परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) ने UGC-NET परीक्षा रद्द केली आहे. आता UGC-NET परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
NEET UG पेपर लीक प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. बिहार पोलिसांनी अटक केलेल्या अनुराग यादव नावाच्या उमेदवाराचा कबुली जबाब समोर आला आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले की, त्याचा काका सिकंदर प्रसाद यादव यांनीच त्याला कोटाहून पाटण्याला बोलावले होते. परीक्षेसाठी सर्व काही सेटिंग झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर ४ मे रोजी रात्री मला अमित आनंद आणि नितीश कुमार यांच्यासोबत पाटणा येथील एका विश्रामगृहात सोडण्यात आले. त्यांनी मला NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिली. तसेच पेपरचा रात्रभर सराव करून घेतला.
अनुरागने असा खुलासाही केला आहे की, दुसऱ्या दिवशी मी परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचलो, तेव्हा प्रश्न पत्रिका पाहून मी थक्क झालो. सर्व प्रश्न तेच होते, ज्याचा मी रात्री अभ्यास केला होता. यानंतर पोलिसांनी अनुरागला अटक केली. अनुरागच्या कबुलीनंतर बिहारमध्ये पेपरफुटी झाल्याचे स्पष्ट झाले. NEET पेपर लीक प्रकरणी कनिष्ठ अभियंता सिकंदर प्रसाद यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेस्ट हाऊसच्या एंट्री रजिस्टरमध्ये ज्याच्या नावाची नोंद आहे, तोच अनुराग यादव आहे. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी यापूर्वीच सिकंदर प्रसाद यादव हे तेजस्वी प्रसाद यादव यांचे स्वीय सचिव प्रीतम यांच्या जवळचे असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी पेपर लीक प्रकरणातील आरोपींचे राजदच्या तीन प्रमुख लोकांशी संबंध असल्याचा दावा केला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे डीआयजी मानवजीत सिंह ढिल्लों यांनी आतापर्यंत चार परीक्षार्थींना अटक केली असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात पेपर फोडणाऱ्या तेरा विद्यार्थ्यांचे रोल कोड मिळाले होते. यातील चौघांना पोलिसांनी अटक केली. उर्वरित 9 उमेदवारांच्या माहितीसाठी, EOU ने परीक्षा आयोजित करणाऱ्या NTA कडून माहिती मागवली होती. माहिती मिळाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे विभागाचे डीआयजीमानवजीत सिंह ढिल्लों यांनी सांगितले की, सर्व उमेदवार बिहारमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आहेत