बारामती : शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कीटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे, हा प्रकार अत्यंत संतापजनक असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुळे या सध्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन याबाबत आपली व्यथा मांडली. हे शेतकरी जेंव्हा रासायनिक खते आणण्यासाठी दुकानात जातात तेंव्हा त्यांना खतासोबत कीटकनाशक विकत घेण्याची सक्ती केली जाते. ते घेतले तरच खते देणार असे सांगितले जाते, ही बाब शेतकऱ्यांनी सुळे यांच्या लक्षात आणून दिली.
बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मांडलेली कैफियत ऐकून वाईट वाटले. हे शेतकरी जेंव्हा रासायनिक खते आणण्यासाठी दुकानात जातात तेंव्हा त्यांना खतासोबत किटकनाशक विकत घेण्याची सक्ती केली जाते. ते घेतले तरच खते देणार असे सांगितले जाते. हा अतिशय संतापजनक प्रकार…
— Supriya Sule (@supriya_sule) June 20, 2024
हा प्रकार लक्षात येताच खासदार सुळे यांनी लागलीच ट्विट करत, ‘हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारची जबरदस्ती कुणालाही करता येत नाही. तरीही त्यांची अशी पिळवणूक होत असेल तर ते चुकीचे आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून अशा दुकानांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत’, अशी मागणी केली आहे.