पुणे : ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या माध्यमातून होणारी मदत छोटी नाही तर महत्वाची आहे कारण रामसेतू बांधताना खारीचा वाटाही मोलाचा होता, चार बोटे उमटवून ईश्वराने खारीला कौतुकाची थाप दिली. नटेश्वर तुम्हाला सुद्धा ही थाप नक्की देईल. मला वाटते शासकीय किंवा शासन तुमच्यापेक्षा कमीच काम करते. फाऊंडेशन किती मोठं आहे किंवा जुनं आहे हे महत्त्वाचे नसते देण्याची भावना खूप महत्त्वाची असते. असे प्रतिपादन संस्कृती कलादर्पण च्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी केले.
पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कला क्षेत्रातील मान्यवरांचा ‘कलाभूषण पुरस्कार’देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी अर्चना नेवरेकर बोलत होत्या. यावेळी लीना बाळा नांदगावकर, ऍड अनुराधा शिंदे, तृप्ती अक्कलवार, नीलिमा लोणारी, अभिनेते शिवराज वाळवेकर,गणेश खुडे , आदित्य जागडे आणि ऑल आर्टिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा क्षेत्रात गेली ४० वर्षे काम करणारे महंमद रफी शेख यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मालिका क्षेत्रातील पदार्पणाबद्दल अभिनेत्री गिरिजा प्रभू, मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेता जगन्नाथ निवंगुणे, सिनेमा क्षेत्रासाठी शिवराज वाळवेकर, संगीत क्षेत्रातील युवा पुरस्कार अविनाश उर्फ बबलू खेडकर, संजय फलफले, तसेच स्वर्गीय गौतम कांबळे यांच्या स्मरणार्थ साऊंड क्षेत्रातील पुरस्कार सचिन शिंदे, अझरुद्दीन अंसारी, नृत्यक्षेत्र कामिनी गायकवाड, संगीत लोकनाट्य क्षेत्र सविता अंधारे, प्रनोती कदम, तसेच तमाशा क्षेत्रातील योगदानाबद्दल हसन शेख पाटेवाडीकर यांचा सन्मान करण्यात आला. निवेदन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मिलिंद कुलकर्णी, अविनाश घुले आणि निरजा आपटे यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली त्यानंतर नांदी, पारंपारिक लावणी यांचे सादरीकरण मोठ्या उत्साहात झाले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर, संगीतकार बप्पी लहरी यांना गाण्यातून आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा मराठे,संतोष चोरडिया यांनीं केले, तर आभार चित्रसेन भवार यांनी मानले.