सुरेश घाडगे
परंडा : परंडा येथे ८ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या सकल मराठा समाज आरक्षण मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जवळपास २००० माहेरवासिनीची आपल्या माहेरी येण्यासाठी लगबग सुरू आहे.
शनिवार (ता. ५ ) परंडा येथे मराठा आरक्षण महामोर्चा संदर्भात चर्चा करण्यासाठी महिला स्वंयसेवकाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण महामोर्चासाठी जास्तीत जास्त महिलांची उपस्थित असावी यासाठी तालुक्यातील सर्वच महिलांनी कंबर कसली आहे.
बैठकीमध्ये बोलताना बऱ्याच महिलांनी सांगितले की मी माझ्या लेकीला मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निरोप धाडला आहे. त्याचबरोबर बऱ्याच मुलींचे आपल्या आईवडीलांना फोन आले की, आई मी येतेय… माझ्या लहान भावासाठी, माझ्या लहान बहिणीसाठी तसेच माझ्या सर्व सकल मराठा बांधवासाठी ८ नोव्हेंबरला येऊन मोर्चात सहभागी होणार आहे, फक्त मीच नाहीतर तुझे जावई, तुझे नातु, तुझी इन, इवाई यांच्यासह सहकुटुंब मी मोर्चामध्ये सहभागी होणार असून माझ्या सासरच्या इतर पाहुणे मंडीळीनाही मी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
याप्रमाणे परंडा तालुक्यातील सर्वच महिलांनी आपल्या लेकीला मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी भावनिक साद घातली आहे. त्यामुळे परंडा तालुक्यामध्ये असे भावनिक चित्र दिसत आहे की जवळपास दोन ते तीन हजार माहेरवासिन मोर्चासाठी उपस्थित रहातील असा अंदाज वर्तविला जात आहे.
परंडा शहरासह पुर्ण तालुक्यामध्ये मराठा आरक्षण संदर्भात संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येकजन आपापल्या पध्दतीने आरक्षणाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या दिड महिण्यापासून सकल मराठा समाजाचे मोर्चा यशस्वी होण्यासाठी दिवस रात्र काम सुरु आहे. प्रत्येकजन आपले दिवसाभराचे कामकाज उरकून संध्याकाळी एक दोन गावात जाऊन प्रचार करत आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये आरक्षण संबधी जनजागृती होऊ लागली आहे.
हा मोर्चा लाखोंच्या संख्येनं निघेल असा अंदाज बांधला जात आहे. या मोर्चाच्या नियोजनात सर्वच मराठा बांधव मतभेद विसरून काम करत आहेत. कितीही श्रीमंत असला किंवा कितीही गरीब असला तरी या नियोजनात तो फक्त सदस्य आहे. गावोगावी बैठका घेताना सुद्धा मागदर्शन करण्यासाठी गेलेले सर्व सदस्य खुर्च्या, टेबलचा वापर न करता समोर बसलेल्या लोकांसोबतच खाली बसून मार्गदर्शन करतात. कुठलाही सत्कार किंवा चहापाण स्विकारात नाहीत हे विशेष आहे.