पुणे : शहरात पुढील सहा दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. १८) शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत. शहरातून जोरदार पाऊस गेले आठवडाभर गायब झाला आहे. गेले काही दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तसेच ढगाळ हवामानाबरोबर ऊन पडत आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. शहरात कमाल तापमान ३३.१, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. शहरात कमी दाबाचा पट्टा कार्यरत नसल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
मंगळवारी कोरेगाव पार्क येथे १ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर शहराच्या काही भागात हल्ली सरी पडल्या आहेत. शहरात येत्या १९ ते २४ जूनदरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. दुपारी किंवा संध्याकाळी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.