मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं, तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. या पराभवानंतर आता भाजपाकडून मंथन सुरु झाले आहे. अशातच भाजपाच्या बैठकीत काही नेत्यांनी या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘द ऑर्गनायझर’मध्येही अजित पवार गटाला बरोबर घेतल्याने भाजपाचा पराभव झाल्याची टीका करण्यात आली होती. त्यानंतर, महायुतीमधील काही नेतेही खासगीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहेत.
या सर्व घडामोडीवर आता पहिल्यांदाच अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी तोफ डागली आहे. लोकसभेतील पराभवानंतर सातत्याने अजित पवार यांना लक्ष्य कराल, तर आम्हाला थेट वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराच महायुतीच्या नेत्यांना अमोल मिटकरी यांनी दिला आहे. एका मराठी वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
संघाच्या मुखपत्रात कोणीतरी एक लेख लिहिल्यानंतर सातत्याने अजित पवारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात सुरू झाला आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल, तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाला दिला आहे.