केडगाव (पुणे ) : प्राचीन काळापासून मातृसत्ताक संस्कृतीमध्ये महिलांना मानाचे स्थान होते. राम राम घालून माणुसकी जिवंत ठेवणारी राम ही बहुजनांची संस्कृती आहे. श्रीराम नाही, असे परखड मत इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौफुला ( ता.दौंड ) येथे तिसऱ्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमेलनाचे उद्घाटन स्वागताध्यक्ष दिग्विजय जेधे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून संजय सोनवणी बोलत होते.
राज्यभरातून आलेले साहित्यिक, लेखक, कवि, कलावंत यांनी स्वर्गीय डी. के.खळदकर साहित्यनगरीत आपले साहित्य सर्वांसमोर सादर केले व याचा रसिकवर्गाने मनमुरादपणे आनंद लुटला.
यावेळी संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, जलदगती न्यायालय मुंबईचे न्यायाधीश वसंत पाटील, लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, जयप्रकाश वाघमारे, रेखा काळे, अभिनेत्री गौरी रत्नपारखी, सुषमा काळे, अभिनेता सागर शेलार, तानाजी केकाण, नितिन भागवत, भाऊसाहेब फडके, विश्वास माने, मोहन जाधव, सागर फडके, वसंत साळुंखे, संजय मेढे, तेजस टेंगले, दत्तात्रय डाडर, बाळासाहेब काळे, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष दीपक पवार, राजाभाऊ जगताप, बाळासाहेब मुळीक, विनायक कांबळे, जगदीप वनशिव, रविंद्र खोरकर, रामभाऊ नातू उपस्थित होते.
भीमथडी साहित्य संमेलनाची सुरवात श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक व ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथदिंडीत कवी, लेखकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
संजय सोनवणी म्हणाले, “बहुजन समाजाने रामायण, महाभारत काळाच्या अगोदर पासून मानवतावादी मुल्ये जपली, पुरुषोत्तम राम लोकांनी मनोभावे स्वीकारला. नमस्कार घालताना राम राम म्हणायचे ही बहुजनांची संस्कृती आहे, यातून माणुसकी, समता, बंधुभाव जोपासना केली जाते. उत्तर भारतात आक्रमण केलेल्या आर्यांनी स्वतः चा प्रभाव निर्माण करण्यासाठी मूळ निवासी भारतीय संस्कृती मोडीत काढताना त्यात बदल केले. पण बहुजनांनी त्याचा कधी स्वीकार केला नाही. शेवटी त्यांना बहुजन, देवता व महापुरुषांचा आधार घ्यावा लागला. मानवी मुल्य जोपासने ही रामाची संस्कृती आहे तर धर्म आणि जातीमध्ये दुरावा करणे ही श्रीरामाची संस्कृती आहे. प्राचीन काळापासून समाजात महिला ही प्रमुख होती. मातृसत्ताक संस्कृती मोडीत काढून पुरुष सत्ताक संस्कृती वैदिकांनी बिंबविण्याचे काम केले.
पुढे दिग्विजय जेधे म्हणाले, “शिवफुलेशाहु महाराजांचा विचार समाजात रुजविण्याचा देशभक्त केशवराव जेधे व सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांनी प्रयत्न केला. समाजाला एकसंध ठेवणारा विचार साहित्यिकांनी शब्दबद्ध करण्याची गरज आहे. भीमथडी साहित्य संमेलनाची ज्योत कायम प्रज्वलित राहणे गरजेचे आहे. भीमथडी चा इतिहास प्रेरणा देणारा आहे.”
प्रास्ताविक करताना दशरथ यादव म्हणाले, “ग्रामीण भागातील साहित्य अजून ही पुस्तकात हवे तेवढे शब्द बद्ध झाले नाही. राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करतात ही गंभीर बाब आहे. समाज मन सक्षम नसेल तर भौतिक प्रगती करून त्याचा उपयोग होणार नाही. साहित्याने समाज सक्षम होतो याचा विसर पडला आहे. साहित्याने क्रांती होते. प्रेरणा मिळते. संमेलनामुळे भीमथडी चा प्रेरणादायी इतिहासातला उजाळा मिळेल.” यावेळी संजय मेढे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि पवार यांनी केले व आभार दिपक पवार यांनी मानले.