अहमदनगर : महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेला उद्या बुधवार 19 जूनपासून सुरुवात होत आहे. दरम्यान ही पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसामुळे उमेदवारांना येणा-या अडचणी लक्षात घेता, ही पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी निलेश लंके यांनी केली आहे.
सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यातच पाऊस सुरू असल्याने उमेदवारांचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे.
महाराष्ट्रात उद्यापासून (बुधवार) म्हणजेच, 19 जून 2024 पासून राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलीस भरतीसाठी 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, बँड पथक आणि चालक पदासाठी उद्या (19 जून) पहाटे पाच वाजल्यापासून पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी 500 उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलीस दलातील शिपाई 25, तर चालकाच्या 39 जागा रिक्त आहेत. यातील पोलीस शिपाई पदासाठीच्या 25 जागांपैकी तीन जागा बॅंड पथकासाठी राखीव आहेत. या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.