पुणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला सपाटून पराभव वाट्याला आला. त्यामध्ये सर्वात मोठी झळ बसली ती अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला. त्यामुळे आता आगामी विधान सभा निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये सारे आलबेल सुरु नसल्याचे समोर येत आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता महायुतीत खटके उडत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात अजित पवार यांना सोबत घेतल्यावरुन भाजपला कानपिचक्या मिळाल्या होत्या. तसेच भाजप आमदारांमध्ये खदखद दिसून येत आहे.
राज्यात लोकसभा निवडणूकीत मोठा उलटफेर झाला आहे. महायुतीला मोठी झळ बसली आहे तर महाविकास आघाडीने मोठीच झेप घेतलेली दिसून आली. अर्थात या पराभवात आपले काय चुकले याबद्दल मनन सुरु आहे.
अजित पवार गटाचे झाले ओझे?
लोकसभा निवडणुकीती अजित पवार गटाची खालावलेली कामगिरी हि भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्याचा परिणाम महायुतीला लोकसभा लोकसभा निवडणुकांमध्ये भोगावा लागला. भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीत नकोसे झाले असल्याची चर्चा सर्वत्र बघयला मिळत आहे. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजपच्या काही आमदारांचे म्हणणे आहे.
अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचेही भाजप आमदारांनी मत व्यक्त केल्याचे समजते. पराभवाचे खापर आता थेट अजित पवार गटावर फोडण्यात येत आहे. तसेच भाजपसह शिंदे गटालाहि अजित पवार गटाचा फायदा झाला नाही. त्यामुळे शिंदे गतला सुध्दा अजित पवार गट नकोसा झाल्याचे बोलले जात आहे. याविषयी उघडपणे कोणी बोलले नसले तरी आरएसएसच्या मुखपत्रातून महायुतीमध्ये अजित पवार गटाला सहभागी करुन घेतल्याप्रकरणीत कान उपटण्यात आले आहे.
अजित पवार गटाला सोबत ठेवण्याबाबत पुनर्विचार
शिरूर मधील खेड विधानसभा मतदार संघात दिलीप मोहिते पाटील, आंबेगाव दिलीप ळळसे पाटील, जुन्नर – अतुल बेनके आणि हडपसर येथे चेतन तुपे हे चार ही आमदार असताना शिवसेनेचे आढळराव पाटील पराभूत झाल्याचे मत काही भाजप आमदारांनी व्यक्त केले आहे. या कारणामुळे अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी आता समोर येत आहे.
मत न मिळालेल्या मतदारसंघांची यादी
अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप काही भाजप आमदारांनी केला आहे. त्यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघांची यादीच समोर केली आहे. यामध्ये माढा, शिरूर ,सोलापूर, दिंडोरी, मावळ, आदी मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्येही बहुतेक ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना फटका बसल्याचे चित्र आहे.