भोकर : मावस बहिणीच्या वाढदिवसानिमित्त नांदेडहून भोकर येथे आलेल्या एका १८ वर्षीय तरुणीने मावशीचे एटीएम कार्ड चोरून विविध ठिकाणावरून एटीएममधून ९ लाख ८३ हजार ५०० रुपये काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेड येथे राहत असलेली एक १८ वर्षीय तरुणी भोकर येथील आपल्या मावशीच्या घरी मे २०२३ मध्ये आली होती. मावस बहिणीचा वाढदिवस झाल्याने काही दिवस ती मावशीच्या घरी राहिली. एटीएममधून पैसे काढण्यासाठी तिची मावशी जात असताना सदर तरुणी सुद्धा मावशी सोबत गेली. यावेळी मावशीने वापरलेला एटीएम कोड तिने लक्षात ठेवला.
काही दिवसानंतर नांदेडला जाताना कपाटात ठेवलेले मावशीचे एटीएम कार्ड तिने चोरले. त्यानंतर २४ मे २०२३ ते १० ऑगस्ट २०२३ दरम्यान त्या एटीएमचा वापर करून ठिकठिकाणच्या एटीएममधून ९ लाख ८३ हजार ५०० रुपये परस्पर काढून मावशीला फसविले. पैसे काढल्यानंतर मोबाईलवर येणारा मेसेज ब्लॉक करून टाकला. त्यामुळे पैसे काढलेला मेसेज मावशीच्या मोबाईलवर आलाचं नाही. काही रक्कम काढण्यासाठी मावशी बँकेत गेली असता खात्यातून अज्ञात व्यक्तीने रक्कम परस्पर काढून घेतल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध यापूर्वी भोकर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. आता या प्रकरणात बहिणीची मुलगीच आरोपी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर तरुणीस १४ जून रोजी पोलिसांनी अटक केली आहे. सपोनि शैलेशचंद्र औटी पुढील तपास करीत आहेत.