छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणीला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी ( दि. १७) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास खुलताबाद तालुक्यातील दौलताबाद परिसरातील सुलीभंजन येथे घडली. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्वेता दिपक सुरवसे (वय-२३, रा.हनुमाननगर,छत्रपती संभाजीनगर ) असं मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ ही घटना घडली आहे. श्वेता आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय-२५ रा.हनुमान नगर) हे दोघेजण सुलीभंजन येथे दत्तधाम मंदिर परिसरात रील बनवत होती.
तिला कार चालवता येत नसताना तिने मित्राला सांगितले की, मी पण आज कार चालवून पाहते. दरम्यान, कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना तिचा पाय अॅक्सिलरेटरवर अधिक दाबानं पडल्याने कार थेट डोंगराच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
मोबाईलवर रिल्स बनवताना घात
सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असून पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्यांने अधिक खुलतो. त्यामुळे भाविक, पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात. अशातच हे दोघेजण गुरुवारी (दि. १७ जून) फिरायला आले. मात्र, मोबाईलवर रिल्स बनवत असताना अपघात झाला. मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते, तर ही घटना घडली नसती अशी चर्चा होत आहे.