मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून आता जोरदार तयारी सुरु झाली आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना व आमदारांना सूचना केल्या आहेत. दुसरीकडे भाजपनेही लोकसभा निवडणुकीतील पराभव झटकून विधानसभेची रणनिती आखायला सुरुवात केली आहे.
अशातच आता राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दौरा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका महायुतीतील पक्ष एकत्र लढणार की स्वबळावर याचाही अंदाज पक्षाचे नेते घेताना दिसत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उद्या अहमदनगर दौऱ्यावर असून आगामी विधानसभेच्या चाचपणीसाठी त्यांचा हा दौरा असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या बाराही जागा लढणार असे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिले आहेत. ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
सुनील तटकरे उद्या अहमदनगर दौऱ्यावर
सुनील तटकरे उद्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. तटकरे हे सकाळी शहर जिल्हा कार्यकारिणी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर दुपारी दक्षिण नगर जिल्हा लोकसभा मतदारसंघातील कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष नाहाटा यांनी दिली आहे.
शिवसेनेला जेवढ्या जागा तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता विधानसभेचं जागावाटप लवकर का अशी, मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. विशेष म्हणजे भुजबळ यांनी 80 ते 90 जागा आणि शिवसेनेला जेवढ्या जागा तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला देण्याचीही मागणी केली आहे.
राष्ट्रवादीकडून 12 जागांवर चाचपणी सरू
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. यामध्ये अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव-पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड या मतदारसंघाचा समावेश होतो. जिल्ह्यातील 6 मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असल्याचे पाहायल मिळते.