सुरत : गुजरातमधील सुरत विमानतळावर दुबईला जाणाऱ्या एका भारतीय व्यक्तीकडून दोन कोटी रुपयांचे कच्चे हिरे जप्त करण्यात आले. संजयभाई माराडिया असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्याने दिली. इंडिगो एअर लाइन्सच्या विमानाने दुबईला जाण्यासाठी ही व्यक्ती शनिवारी सकाळी साडेआठ वाजता विमानतळावर दाखल झाली. यावेळी तपासणी केली असता त्याच्याकडे १,०९२ ग्रॅम वजनाचे पॉलिश न केलेले हिरे आढळून आले. या व्यक्तीने अंतर्वस्त्रांमध्ये व पायमोज्यांमध्ये हे हिरे लपवून ठेवले होते. जप्त केलेले हिरे सीमा शुल्क विभागाच्या प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. या हिऱ्यांची किंमत २.१९ कोटी रुपये असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.