पुणे : पुणे शहर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नेहमी चर्चेत असतं. शहरात आता खळबळ उडवून देणाऱ्या आणखी दोन घटना समोर आल्या आहेत. वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या अशा या घटना आहेत. या घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये वडिलांनी पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले असल्याची ही प्रकरणे उघडकीस आली आहेत.
शहरात घडलेली पहिली घटना अशी आहे की, पुणे शहरातील दक्षिण पुण्याच्या बिबवेवाडी परिसरामध्ये 22 वर्षाच्या वडिलांनी त्याच्या साडे चार वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडिलांनी पोटच्या मुलीला हाताने व बेलण्याने जबर मारहाण केली आहे. मुलीच्या अंगावरील काही भागावर क्रूरपणे चावा घेतला. तसेच तिला गरम चाकूने चटकेही दिले आहे. पोटच्या मुलीला घरामध्ये दोरीने बांधून उलटे टांगले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हे निर्दयी कृत्य करणाऱ्या नराधम वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरात घडलेली दुसरी घटना अशी आहे की, पुणे शहरातील कोंढवा परिसर जवळील भाग्योदयनगर परिसरात एका 40 वर्षीय वडिलांनी पोटच्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. ही मुलगी घरामध्ये असताना तिला व तिच्या आईला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि पोटच्या मुलीवर अत्याचार केले. आरोपी वडिलांनी काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची आई कामासाठी बाहेर गेल्यानंतर पोटच्या मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिच्या शेजारी बसून टीव्ही पाहण्याचे नाटक करीत तिचा हात धरला. त्यानंतर हाताचे चुंबन घेत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, त्याच्या मुलीने वडिलांना विरोध केला असता मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा वडिलांनी घरामध्ये कोणी नसल्याचा गैरफायदा घेत मुलीवर जबरदस्ती केली. मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार करीत बलात्कार केला. हा घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास आईला आणि मुलीला मारून टाकण्याची धमकीही दिली. या घडलेल्या घटनेनंतर नराधम वडिलांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शहरातील या दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता रस्त्यावरच नव्हे तर मुली आणि महिला घरातही सुरक्षित आहेत की नाही अशी शंका निर्माण करणाऱ्या या घटना आपल्या डोळ्यांसमोर घडत असलेल्या दिसून येत आहेत. अशा प्रकारच्या अनेक घटना मागील काही वर्षात पुण्यात घडलेल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशा घटना घडल्यानंतर अनेकदा पीडित मुली आणि महिला समोर येऊन तक्रार दाखल करीत नाहीत. परंतु, न घाबरता पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे.