छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटली म्हणजे आयुष्याची बरीच वर्ष विद्यार्थी मेहनत घेत असतात. ऐनवेळी पोटाला चिंमटा देऊन, आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ जाईल म्हणून स्वताच मन मारून अभ्यास करत असतात, आपल्या आई-वडिलांपासून दूर राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. पुणे, मुंबई, दिल्ली यांसारख्या शहरात राहून एमपीएससी आणि युपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला जातो.
अधिकारी होण्याचे स्वप्न रोज बघत असतात,पण हे घडत असताना किरकोळ कारणास्तव तुम्हाला परीक्षेपासून वंचित राहावे लागले तर होणारा संताप व्यक्त करायला तुमच्याकडे शब्दही उरत नाहीत. असाच काहीस अप्रकार घडला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आज देशभरात युपीएससीसाठी ची प्रिलियम परीक्षा होत असून छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 50 विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे.
संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झाले आहेत. मात्र, गुगल मॅपच्या चुकीच्या माहितीमुळे यूपीएससीच्या अनेक विद्यार्थ्य़ांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी अगदी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. शहरात जवळपास 50 विद्यार्थ्यांना उशीर झाला म्हणून परीक्षा देता आली नाही. त्यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. रीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी त्यांना उशीर झाला, त्याला कारणीभूत ठरलं ते गुगल मॅप अॅप. गुगल मॅपवरुन परीक्षा केंद्राचा शोध घेत हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले, पण तोपर्यंत खूप उशीर होऊन गेला होता.
एका विद्यार्थ्याने माहिती देताना सांगितले विवेकानंद कला, सरदार दिलीपसिंग वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद येथे आम्ही युपीएससी परीक्षेच्या केंद्रावर आलो आहोत. पण, गुगल मॅपवर हे कॉलेज केंद्र स्थळापासून 12 किमी दूरवर दाखवत आहे. वाळूज येथे हे कॉलेज गुगल मॅपवर दिसत आहे, गुगल मॅपवर कॉलेजचा पत्ता टाकल्यानंतर ते वाळूज येथे असल्याचे दिसून येते. सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांना रिपोर्टींग वेळ देण्यात आली होती. तर, 9.30 वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र, 9 वाजून 2 ते 5 मिनिटांनी विद्यार्थी विद्यार्थी केंद्रावर पोहोचले. पण, परीक्षा केंद्रावरील संबंधितांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवून दिले नाही. आम्ही वारंवार विनंती केली, तरीही केवळ 2 ते 5 मिनिटांच्या उशिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. असे एका विद्यार्थ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.