लोणी काळभोर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, गणवेश व पुस्तके देऊन मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली आहे.
राज्यात सन २०२४ ते २०२५ या शैक्षणिक वर्षाला आज शनिवारी (ता. १५) सुरवात झाली. त्याच अनुषंगाने लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सुभाष अप्पा काळभोर, कार्याध्यक्ष राहुल काळभोर, विद्यालयाचे मार्गदर्शक विठ्ठल काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, उपसरपंच प्रियांका काळभोर, माजी सरपंच योगेश काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुभाष अप्पा काळभोर म्हणाले की, नियम आणि नियमांचे कठोर पालन म्हणून शिस्तीचा अनेकदा गैरसमज केला जातो. तथापि, शिक्षणाच्या क्षेत्रात, त्यात बरेच काही समाविष्ट आहे. शिस्त हा चारित्र्य विकासाचा पाया आहे, वर्तणूक सुधारणे आणि जीवनात यश मिळवण्याचे साधन आहे. हे मुलांना चिकाटी, परिश्रम आणि वेळेचा आदर यासारखी अत्यावश्यक मूल्ये शिकवते, ते त्यांच्या आयुष्यभर बाळगू शकतात अशी वैशिष्ट्ये.
पृथ्वीराज कपूर हायस्कूल हे शिस्त लावण्यासाठी आणि भावी पिढीला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या आदर्श शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. शाळेचे व तुमचे नाव कमवावे असे नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो. असे सुभाष काळभोर यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, “मी रोज शाळेत येणार , मी खूप शिकणार.” अशा घोषवाक्यांच्या सेल्फी पॉईंट वर नवीन विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक देण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर, नवा डबा, नवे दप्तर, वह्या पुस्तकांची नवलाई दिसून आली. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं विद्यालयाचा परिसर गजबजून गेला.
यावेळी नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी यांनी शाल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका रेखा पाटील यांनी तर सूत्रसंचालन विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका कल्पना बोरकर यांनी केले.