पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाचा धुमाकूळ वाढत असल्याच पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात देखील वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
खरीप हंगाम यावेळी फुलणार
राज्याच्या अनेक भागात सध्या चांगला पाऊस होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळं शेतकरी सुखावला आहे. शेती कामांना वेग आला आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यानं शेतकऱ्यांचा खरीप हंगाम यावेळी चांगलाच बहरणार आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी देखील केल्याचं चित्र आहे.