धाराशिव : पोलीस असल्याचे भासवून गुन्हा मिटविण्याचा बहाणा करीत ५० हजार रुपयाची मागणी केली. ही घटना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोलापूर येथील जुनेद हबीबोकद्दीन चंदा व मुनिर रियाज रंगरेज (रा. कुंभारी ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्यादी रहीम इस्माईल सय्यद (वय ५४ वर्षे, रा. अक्कलकोट रोड नळदुर्ग ) यांची फसवणूक केली. त्या दोघांनी १२ जून रोजी दु. ४.३० वाजेच्या सुमारास आम्ही पोलीस आहोत असे खोटे सांगितले. तुझ्या भाच्याने मुनिर रंगरेज यांच्या भाचीची सोलापूरमध्ये रमजान महिन्यात छेड काढली आहे, असे खोटे बोलून गुन्हा मिटवून घेण्यासाठी फिर्यादीस ५० हजार रुपयाची मागणी केली. ही रक्कम नाही दिल्यास फिर्यादीचा भाचा नवाज सय्यद यास घेवून जाण्याची धमकी दिली. याप्रकरणी रहीम सय्यद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्यात जुनेद व मुनिर यांच्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.