पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या २५ टक्के ऑनलाइन “प्रवेशप्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून सोडत काढली तरी विद्यार्थ्यांना शाळा निश्चित करून प्रत्यक्ष प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. न्यायालयाकडून खासगी शाळांच्या संदर्भातील सुनावणी अद्याप होऊ शकली नाही. परिणामी, प्रत्यक्ष प्रवेशासाठी पालकांना प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.
आरटीई प्रवेशासाठीची सोडत ७ जून रोजी काढण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना शाळा अलॉटमेंट आणि प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळापत्रक १२ जूननंतर जाहीर केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. काही खासगी शाळांच्या विषयावर न्यायालयात १२ जूनला सुनावणी होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, सुनावणी झाली नसल्याने वेळापत्रक जाहीर होऊ शकले नाही. यापूर्वी आरटीई कायद्यात बदल करून नव्या पद्धतीनुसार ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली. या प्रक्रियेविरोधात पालक आणि शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या. न्यायालयाने ही प्रक्रिया स्थगित केल्यानंतर जुन्या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आली. मात्र ही प्रवेशप्रक्रिया सुद्धा रखडल्याने पालकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. काही खासगी शाळांचे वर्ग यापूर्वी सुरू झाले आहेत. आरटीई कायद्यातील बदल आणि पुन्हा जुन्या पद्धतीनुसार सुरू केलेली प्रवेशप्रक्रिया यामध्ये बराच कालावधी निघून गेला आहे. आरटीईचे वर्ग उशिरा सुरू झाल्यास याचा फटका विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला बसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.