पुणे : खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. निलेश लंके सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, त्यांनी गुरुवारी गजा मारणे याची भेट घेतली. यावेळी खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
कुख्यात गुंड गजा मारणे यांच्याविरोधात अनेक गुन्ह्याची नोंद असून त्यांच्याविरोधात अनेक खटले सुरु आहेत. यामध्ये अनेक गंभीर गुन्ह्याचा देखील समावेश आहे. गुंड गजा मारणेला अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात अटक झाली होती. तो तीन वर्ष येरवडा कारागृहात होते. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
दरम्यान, कुख्यात गुंड गजा मारणे याने अजित पवार गटाचे पार्थ पवार यांची भेट घेतली होती, त्यावरुनही वाद निर्माण झाला होता. आता त्याने लंके यांची देखील भेट घेतली असल्याने यावरुनही राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.