यवत: शरद पवार हे दुष्काळी दौऱ्यानिमित्त दौंड तालुक्यातील विविध गावांना भेट देत असून यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. राज्यासह दौंड तालुक्यात देखील काही भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यानुसार पवार यांनी आज (ता. १३) दुपारी २ च्या सुमारास खोर गावाला भेट दिली.
यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, खोर गावाच्या पाण्यासाठी गेले अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. यावर्षी देखील तीन टँकरच्या साह्याने गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पाण्यासाठी जानाई-शिरसाई योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला. परंतु, हे पाणी पुरेशे नाही. खोर परिसरातील नागरिकांचे पाण्याशिवाय काहीही मागणे नाही, अशी मागणी यावेळी पवार यांनी केली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना दौंड तालुक्याने मताधिक्य दिल्याबद्दल मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी खोर ग्रामस्थांनी पुरंदर उपसा योजनेचे पाणी मुंडे येथे असून पुढील तीन किलोमीटर अंतरावर डोंबेवाडी तलावात सोडण्याची मागणी केली. तर, जानाई शिरसाई योजनेचे पाणी बंद पाईपलानेद्वारे मिळावे, अशी देखील मागणी केली.
यावेळी शरद पवार यांनी गेल्या तीन दिवसांपासून दुष्काळी दौरा सुरू असून पाण्याबाबत जास्तीत जास्त निवेदने मिळत आहेत. त्यानंतर शरद पवार म्हणाले की, जानाई-शिरसई योजना केली, तलाव केले. याचा फायदा अनेक गावांना मिळाला. जानाई शिरसाई व पुरंदर उपसा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा कशा पद्धतीने करता येईल, याबाबत पाटबंधारे विभागाशी लवकरच चर्चा केली जाईल, आश्वासन पवार यांनी दिले. निवडणूक काळात अनेक गावांमध्ये फिरलो असून अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. याकडे सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारला सांगून कामे करून घ्यावे लागतील. परंतु, पुढील चार महिन्यांत निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आता हे सरकार किती काम करेल याबाबत शंका आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सरकार बदलायचे आहे. खासदार सुप्रिया सुळे या मुलाच्या पदवीप्रदान समारंभासाठी लंडन दाैऱ्यावर गेल्या असून मुलाच्या पदवीप्रदान सोहळ्यास आई-वडील उपस्थित राहणे आवश्यक असल्याने सुळे या दुष्काळी दौऱ्याला उपस्थित नसल्याचे सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी दौंड तालुक्यातील खोरसह देऊळगाव गाडा, पडवी , कुसेगाव, रोटी, वासुंदे आदी गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकार दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नामदेव ताकवणे, जगन्नाथ शेवाळे, रामभाऊ टुले, योगिनी दिवेकर, अमित दोरगे, योगेश शिंदे, काँग्रेस पक्षाचे विठ्ठल दोरगे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस व शिवसेना व महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.