चाकण (पुणे): चाकण बाजार समितीमध्ये पाच ते सहा गाव गुडांनी हप्त्याची मागणी करत धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी शेतकरी आणि आडत व्यापाऱ्यांसह बाजार समिती संचालकांना गाव गुंडांनी मारहाण केली. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर गाव गुंडाचा बंदोबस्त करा, अन्यथा बाजार समिती बंद ठेवण्याचा इशारा देत व्यापारी व आडते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण बाजार समितीमध्ये गाव गुंडांनी हप्त्याची मागणी करत मध्यरात्री दहशत माजवली. तसेच आडत व्यापाऱ्यांना पाच ते सहा जणांकडून बेदम मारहाण झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. मारहाण केल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गाव गुंडांनी रात्री बाजार समितीमध्ये येत तेथील शेतकऱ्यांना धमकावले होते. त्यानंतर आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली होती. मात्र, पोलिसांनी पहाटे आरोपींना सोडून दिले. पोलिसांनी सोडून दिल्यानंतर या गुंडांनी पुन्हा बाजार समितीमध्ये येऊन जोरदार राडा घातला. यावेळी त्यांनी दगड, काठी, कोयत्यांनी दहशत माजवत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मारहाण केली. या घटनेमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.