सणसवाडी : पुणे – नगर महामार्गावर पायी चालणाऱ्या दोघांना पाठीमागून चारचाकीने धडक दिल्याने दोनजण गंभीर जखमी झाले होते. यामध्ये सणसवाडी गावचे माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांना डोक्याला जबर मार लागला, तर दगडू दरेकर हे किरकोळ जखमी झाले होते.
सणसवाडी येथील वर्षश्राद्ध कार्यक्रमाला हजेरी लावून पुण्याच्या दिशेने आपल्या गाडी जवळ जात असताना क्रेटा कार पायी चाललेल्या या दोघांना येऊन जोरात धडकली. या अपघातात दत्तात्रय हरगुडे यांचा मागील बाजूस तोल जाऊन डोक्याला गंभीर जखम झाली होती, तर दगडू दरेकर यांना मुका मार लागला. हरगुडे यांना जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी मनिपल हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तरुणांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची शुद्ध हरपली असून त्यांच्या पुढील वैद्यकीय शस्त्रक्रिया करणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. दत्तात्रय हरगुडे यांनी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एक आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कामाच्या कतृत्वाने गावासह परिसरात ते नेहमी चर्चेत राहायचे. तरूणांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.