लोणी काळभोर : लोखंडी सळई न दिल्याचा राग मनात धरुन अट्टल गुन्हेगार राज पवारसह त्याच्या तीन साथीदारांनी दोन कामगारांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट नं 1050 येथील अथर्व प्लॉटींगच्या नवीन इमारतीच्या बांधकामामध्ये सोमवारी (ता.10) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश सैनी (वय 22, रा. गुजरवस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) व गोविंदकुमार साह असे जखमी झालेल्यांची नावे आहते. तर राज रविंद्र पवार (रा. गुजरवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे), संकेत गायकवाड व त्याचे दोन अनोळखी मित्रावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश सैनी त्यांचे मित्र गोविंदकुमार साह, ठेकेदार नामे नकुल शिंदे व प्लॉटींग मालक आकाश काळभोर हे चौघेजण अथर्व प्लॉटींगच्या नवीन इमारतीच्या बांधकामामध्ये बसले होते. तेव्हा तेथे चौघे आरोपी आले. आरोपींनी लोखंडी सळई मागितली तेव्हा फिर्यादी यांनी त्यास नकार दिला. लोखंडी सळई न दिल्याचा राग मनात धरून आरोपी राजु पवार याने लाकडी काटीने, फिर्यादी दिनेश सैनी याला मारहाण केली. तसेच संकेत गायकवाड व त्याचे दोन अनोळखी मित्रांनी दिनेश सैनी व गोविंदकुमार साह यांना मारहाण करुन शिवीगाळ केली.
दरम्यान, सदर भांडणे सोडविण्यासाठी ठेकेदार नकुल शिंदे व प्लॉटींग मालक आकाश काळभोर आले असता, आरोपी राज पवार यांने त्यांनाही धमकी दिली. व पळून जाताना ऑफिसच्या खिडकीवर दगड मारुन खिडकी फोडली.
याप्रकरणी राज पवार व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.