पुणे/शिरूर : कारेगाव रांजणगाव गणपती येथील भांबार्डे रस्त्यावरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारील ‘अथर्व ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे १६ लाख २५ हजारांचा सोने व चांदीचा ऐवज लंपास केला आहे. याबाबतची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
दरम्यान, रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि १२) रोजी पहाटेच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. श्रीहरी निवृत्ती खोल्लम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १२ जुन रोजी सकाळी ६ वा. दुकानाच्या वरील मजल्यावर राहणाऱ्या हर्षल प्रविण पाटील यांनी तुमच्या दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर तुटले असुन चोरी झाली असल्याचा संशय व्यक्त केला. तेव्हा दुकानाकडे बघितले असता दुकानात चोरी झाल्याचे दिसुन आले.
याघटनेची माहिती मिळताच शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, सहायक पोलिस निरीक्षक बजरंग झेंडे, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलिस हवालदार संतोष औटी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाची पाहणी करुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे हे करीत आहेत.