पुणे : शहरामध्ये आपण जिकडे बघू तिकडे कारखाने उभे होताना दिसत आहेत. सोबत वाढत जाणारी वाहनांची संख्या, या दोन्ही गोष्टींचा आपल्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बाबी आहेत. वाढत्या कारखानदारीमुळे आणि वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन कणांचे प्रदूषण होते. तर खेडेगावांमध्ये वाळूचे आणि धूळचे प्रमाण जास्त असल्यामुळे वातावरण दूषित झालेले दिसून येते. कडकडीत उन्हाळा आपल्याला जवळजवळ पाच-सहा महिने तरी जाणवतो, वातावरणामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा परिणामामुळे आपल्याला कडकडीत उन्हाळा आणि उच्च तापमान यांचा त्रास आपल्याला सहन करावा लागत असून त्याचे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम सुद्धा होतात.
डोळ्यांवर अति उन्हाळ्याचा वाईट परिणाम अनेक प्रकारे होत असतो. जळजळ होणे, डोळ्यांना कोरडेपणा येणे, डोळे लाल होऊन आपल्या डोळ्यातील अश्रू निर्माण करणाऱ्या मेबोमियन ग्रंथी खराब होणे आणि त्यामुळे ड्राय आय सिंड्रोम असा विकार अनेकांमध्ये दिसून येतो. डोळे पुन्हा पुन्हा गार पाण्याने स्वच्छ धुणे, नेत्र तज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेणे आणि डोळ्यांमध्ये लुब्रिकंट औषध टाकण. असे प्राथमिक उपचार करावे लागतात.
उन्हाळ्यामध्ये कोरडेपणा व हवेतील प्रदूषण डोळ्यांचे आजार उद्भवत असतात. यामध्ये डोळे येणे हा संसर्गजन्य रोग नेहमी आढळतो. डोळे येणे किंवा सूक्ष्म जीवाणूंचा संसर्ग होऊन डोळे लाल होतात. पापणी आणि डोळ्यांचे आवरण याला फोड येतात, घाण येऊ लागते व डोळ्यांमध्ये रक्तस्त्रावही होतो. यावर उपाय म्हणून गार पाण्याने डोळे स्वच्छ धुणे आणि नेत्र तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधांचा वापर करणे हे उपचार करता येतात.
पावसाळ्यामध्ये शेतामध्ये असलेली बुरशी हवेतून डोळ्यांमध्ये जाते आणि बुबळाला जखम होणे, कॉर्नियल अल्सर आणि पू होणे असे विकार होऊ शकतात. त्याचा योग्य वेळी उपचार घेतला नाही तर डोळ्यांमध्ये कायमचे फूल पडते आणि अंधत्व सुद्धा येऊ शकते.