दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथील वनक्षेत्रात घोरपडीच्या शिकारीसाठी आलेल्या दोन जणांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्या दोन शिकाऱ्यांकडून एक जिवंत घोरपड जप्त करण्यात आली आहे. या दोन शिकाऱ्यांनी वनक्षेत्रात एका सशाची शिकार केली होती.
पुणे जिल्ह्यातील दौंड – कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गोपाळवाडी येथील राखीव वनक्षेत्र परिसरात दोन शिकाऱ्यांनी एक जिवंत घोरपड पकडल्याची माहिती वन अभ्यासक प्रल्हाद जाधव यांना मिळाली होती. त्यांनी त्याविषयी दौंडचे वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना कळविले. वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविलेल्या शोध मोहिमेत गोरख अंबादास जाधव ( वय 57 , रा. पोथरे , ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि भरत जनार्दन जाधव (वय 34, रा. पिंपरखेड , ता. आष्टी, जि. बीड) या दोन शिकाऱ्यांना एका जिवंत घोरपडीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांनी एका सशाची शिकार केल्याचे आढळून आले.
दोन्ही शिकाऱ्यांनी वनक्षेत्रात शिकारीसाठी दोन श्वान, लोखंडी कोयता, लोखंडी गज आणि दोरी सोबत आणले होते. यावेळी शिकारीसाठी वापरलेली एक दुचाकी देखील जप्त करण्यात आली. संशयित आरोपी गोरख जाधव व भरत जाधव यांच्याविरूध्द वन्यजीव संरक्षण कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्यासह वनरक्षक जी. बी. गवळी, वनपाल एन. सी. चव्हाण, वन कर्मचारी अशोक जाधव, राजू मोरे यांनी या कारवाईत सहभागी होते.