बेळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीने न्यायालयाच्या आवारात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. यामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी संतप्त झालेल्या जमावाकडून आरोपीची चांगलीच धुलाई केली. जयेश पुजारी असे आरोपीचे नाव आहे.
नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या जयेश पुजारीने पोलिस अधिकाऱ्याला सुद्धा धमकी दिली होती. या प्रकरणात आज 12 जून रोजी जयेश पुजारीला बेळगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने न्यायालय आवारातच पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जयेश पुजारीने नितीन गडकरी यांना सहा महिन्यांपूर्वी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तुरुंगात असताना लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न पुजारीने केला होता. त्यानंतर त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली होती.
तपासणीत त्याच्या पोटात वायरचे तुकडे असल्याची पुष्टी झाली. मात्र, त्याच्या प्रकृतीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. त्याला डॉक्टरांनी तंदुरुस्त घोषित केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर त्याला पुन्हा मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.