नागपूर : नागपुरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एका कार अपघातात 22 मे रोजी 82 वर्षीय पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना हा अपघात नसून हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
संपत्तीच्या कारणावरून हत्या
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नसून हत्या केल्याचे प्रकरण असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. संपत्तीच्या कारणावरून ही हत्या करण्यात आली आहे. 82 वर्षीय पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांची सून अर्चना पुट्टेवारने सासर्यांच्या हत्येची सुपारी कुटुंबातील ड्रायव्हर सार्थक बागडेचे माध्यमातून दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ड्रायव्हर सार्थक बागडेने नीरज नीमजे आणि सचिन धार्मिक या दोघांना पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांच्या अपघातातून हत्येची सुपारी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात सून अर्चना पुट्टेवार, ड्रायव्हर सार्थक बागडे, नीरज नीमजे आणि सचिन धार्मिक या चारही आरोपींना अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
नाशिक शहरातील बालाजी नगर परिसरात 22 मे रोजी 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना भरधाव कारने चिरडल होतं. यामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला अजनी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचीच नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.
पोलिसांना या तपासात सुनियोजित पद्धतीने हा अपघात घडवून आणल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता पु्ट्टेवार यांना धडक देणाऱ्या कारमध्ये हे दोघे स्वार होते आणि त्यांना सार्थक बागडेने अपघातातून हत्या करण्याचं काम दिल्याचे उघड झाले. तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली कार खरेदीसाठी अर्चना पुट्टेवार यांनी पैसे दिल्याची माहिती देखील नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांनी दिली.
सुनेनी दिली सासऱ्याच्या हत्येची सुपारी
पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांच्याकडे 300 कोटींची संपत्ती होती. त्यामध्ये अर्चना पुट्टेवारला भाग न मिळाल्याने त्यांनी 82 वर्षीय पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिली होती.