पुणे : पुण्यात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आज (ता. ४) शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आंदोलन केले असून संभाजी भिडे यांच्या पोस्टरला टिकली लावून जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.
काही दिवसांपुर्वी संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला ‘आधी टिकली लावून ये, मग मी तुझ्याशी बोलतो’, अशी प्रतिक्रिया दिली होती. महिलांच्या स्वातंत्र्याविरोधी हे वक्तव्य केल्याने राज्याचे वातावरण तापलेले आहे.
बुधवारी (ता. २) संध्याकाळी संभाजी भिडे हे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर भिडे गुरुजी बाहेर पडले. यावेळी एका महिल पत्रकाराने त्यांना भेटीत काय झाले, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी आधी तू कुंकू लावून ये, मग मी तुझ्याशी बोलतो, असे वक्तव्य केले. तसेच प्रत्येक महिला ही भारतमातेचे रुप आहे. भारतमाता विधवा नाही, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.
यावरून महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. महिला आयोगामार्फतही संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सदर वक्तव्यानंतर भिडे यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, असे नोटीशीत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महिलांच्या स्वातंत्र्याविरोधी हे वक्तव्य केल्याने संभाजी भिडे यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात येत आहे. यामुळे पुण्यात आज महिला काँग्रेसने आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करून विरोध दर्शविला आहे. तसेच अनेक नेत्यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्या बद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.