नाशिक : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला तो म्हणजे, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 8 जूनपासून पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला सकल मराठा समाजाने आपली भूमिका पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आहे.
यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक करण गायकर म्हणाले की, लोकसभा निवडणूका झाल्यानंतर मराठा समाजाच्या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषण करत आहे. आम्हीही या लढ्यात सहभागी होत आहोत. आमदार आणि खासदार यांना सकल मराठा समाजाची विनंती आहे की, नवनिर्वाचित खासदारांनी तात्काळ अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांना आपल्या लेटर पॅडवर पाठिंबा द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना आपण जर पाठिंबा देणार नसाल तर तुम्ही मतदारसंघात कसे फिरणार तेच बघतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
..तर आम्ही पुढील भूमिका ठरवणार
पुढील दोन दिवसांत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सोडविले नाही तर आम्ही पुढील भूमिका घेऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला तरी चालेल. सरकारने मनोज जरांगे पाटील यांना फसवलं आहे. तसेच सगेसोयरेची फसवणूक झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा फटका बसला की नाही याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे. आमच्या मागण्यांचा विचार करा, अजूनही वेळ गेली नाही, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
…तर आमचे पहिले उपोषण हे शरद पवार यांच्या घरापासून
ते पुढे म्हणाले की, सकल मराठा समाज शरद पवार यांना विनंती करतो की, आपण पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीचे जसे नेतृत्व केले, तसे आपण मराठा आरक्षणासाठी सर्व पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना सोबत घ्यावे. तसेच अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे. शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला तर आम्ही सर्व मराठा समाज आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू. आम्हाला जर आपण पाठिंबा देणार नसेल तर आम्ही राज्यभर लाक्षणिक उपोषण करू आणि आमचे पहिले उपोषण हे शरद पवार यांच्या घरापासून असेल, असा इशारा यावेळी करण गायकर यांनी दिला आहे.