बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागील अडचणी कमी होण्याची चिन्हे काही दिसत नाही. त्यांच्यामागे धक्क्यांची मालिका सुरुच आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा एकच खासदार निवडून आला आहे. तसेच NDA सरकारच्या कॅबिनेटमध्ये पण त्यांना स्थान मिळाले नाही. त्यांना राज्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु या ऑफरला पवार गटाने नकार दिला. विधानसभेची मोर्चे बांधणी सुरु करण्यापूर्वीच बारामतीमधील काही नागरिकांनी मात्र आता दादांना बदलण्याची मागणी केली आहे. बारामतीतून नवीन चेहरा देण्यासाठी काही जणांनी शरद पवारांकडे आग्रह धरला आहे.
‘या’ युवा नेत्याचे नाव केले पुढे
आम्हाला आता बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. सध्या शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. गोविंद बागेत भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर आताच्या राजकीय नेत्याविषयी खंतही व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
दादा शब्द फिरवणार ?
असं बोललं जात आहे, कि बारामतीतमध्ये विधानसभेला पवार विरुध्द पवार अशी लढत होणार नाही. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला अजित पवारांनी शब्द दिला होता, की जर सुनेत्रा पवार पडल्या तर मी विधानसभा लढणार नाही. असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचा दावा सुद्धा काही नागरिकांनी केला आहे. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्याकडे करण्यात आली.
गेल्या विधानसभेत अजितदादांचा मोठा विजय
2019 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी राष्ट्रवादीत उभी फुट पडलेली नव्हती. त्यावेळी अजित पवार यांना 1,95,641 मते पडली होती. तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांना 30,376 मते पडली होती. अजितदादांनी पडळकर यांचा 1,65,265 मतांनी पराभव केला होता.
शरद पवार बारामती दौऱ्यावर
शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ते मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.