पुणे : नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 100 टक्के अनुदानित मोफत पास योजना सुरू करण्यात आली आहे. तर पुणे महापालिका हद्दीतील खासगी शाळेतील इयत्ता 5वी ते इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के अनुदानित मोफत बस प्रवास पास देणार आहे, त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना मोफत पाससाठी बुधवार (ता. 12) जूनपासून अर्जाचे वाटप सर्व आगारांमधून आणि पास केंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच भरुन दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रितरित्या घेऊन जाऊ शकतात.
हे अर्ज भरून आगारात एकत्रित जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेला एकत्रित पास दिले जातील. महामंडळाने दिलेले सर्व पास शाळाप्रमुखांनी त्यांच्या शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही,’ असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.
प्रस्तुत योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारामध्ये उपलब्ध आहे. तरी पुणे मनपाचे शाळेतील व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.