संतोष पवार
पळसदेव : इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पळसदेव आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून रोहिणी तसेच मृग नक्षत्रातील पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. वैशाख वणव्याच्या झळा आणि असहाय्य उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा दिला आहे.
मात्र, पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित होणे, मोबाईल नेटवर्क गायब होणे अशा विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या चार -पाच दिवसापासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी सायंकाळी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने शेतशिवार खळाळून निघाला आहे. रस्त्यावरील अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठलेली होती.
इंदापूर तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी तयारी करीत आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा मात्र पल्लवीत झाल्या असून पुढील पिकांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.