पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याच्या भावावर हिंजवडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
नॅन्सी ब्रह्मा असोसिएटस ही 2007 या वर्षी बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचे विकसक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल, राम कुमार अग्रवाल, विनोद कुमार अग्रवाल, नंदलाल किमतानी, आशिष किमतानी आणि इतर लोकांच्या विरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातप्रकरणी विशाल अरुण अडसूळ (वय -42, रा. नॅन्सी ब्रह्मा रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बावधन पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे बांधण्यात आलेली नॅन्सी ब्रह्मा को. ऑप. हौ. सोसायटी मध्ये 2007 या वर्षी 71 जणांनी फ्लॅट घेतला होता. याच सोसायटीच्या मालकीची त्याठिकाणी पार्किंग आणि अँमीनीटी स्पेस, मोकळी जागा आहे. मात्र, एकाच ठिकाणची जागा वेगवेगळ्या नकाशावर दर्शवून नकाशात फेरबदल करुन तसे नकाशे मंजूर करुन घेतले गेले आहे.
नॅन्सी ब्रह्मा सोसायटीच्या सभासदांची कोणतीही परवानगी नसताना बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करुन सोसायटीच्या जागेवर 11 मजली इमारतीत 66 कमर्शियल ऑफिस बांधले तर 10 मजली इमारतीत 27 सदनिका आणि 18 शॉप्स बांधून नॅन्सी ब्रह्मा को. ऑप. हौ. सोसायटी. ली. सोसायटी धारकांचा विश्वासघात करुन फसवणूक केली.
या अपघातप्रकरणी विशाल अडसूळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल अग्रवाल व त्याच्या भावांसह इतरांवर महाराष्ट्र ओनरशिप अॅक्ट (मोफा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करीत आहेत.