लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकी व बसचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाक वस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ॲक्सिस बँकेसमोर, सोमवारी (दि.10) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मामाभाचीसह तिघे जखमी झाले आहेत.
शिवराम बन्सी कराड (वय 38) ज्ञानेश्वरी शामराव लाटे वय (20) हे दोघे (रा. एमआयटी लोणी काळभोर) व दत्ताराम रमेश कांबळे (रा.लोणी काळभोर, ता.हवेली) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम कराड व ज्ञानेश्वरी लाटे हे दोघे नात्याने मामा भाची आहेत. कराड हे लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात चालक म्हणून काम करतात व संकुलातील खोल्यांमध्ये राहतात. ज्ञानेश्वरी हे वाघोली येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तर दत्ताराम कांबळे हे लोणी काळभोर येथील एचपीसीएल कंपनी मधील कॅन्टींग मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात.
ज्ञानेश्वरी ही रोज बसने कॉलेजला ये-जा करीत असते व तिचे मामा शिवराज कराड हे तिला दररोज दुचाकीवरून स्टॉपपर्यंत सोडवीत असतात. दरम्यान, नेहमीप्रमाणे शिवराज हे भाचे ज्ञानेश्वरीला बस स्टॉप वर सोडवण्यासाठी दुचाकीवरून जात होते. तर कॅन्टीन मॅनेजर कांबळे हे कॅन्टींगचे सामान घेऊन दुचाकीवरून कॅन्टींगकडे निघाले होते.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, कदम वाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील ॲक्सिस बँकेच्या समोर या दोन्ही दुचाकींचा अपघात झाला. दुचाकीच्या पाठीमागे बसलेली ज्ञानेश्वरी ही महामार्गावर पडली. त्याचवेळी लोणी काळभोर कडून पुण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या बसचे चाक ज्ञानेश्वरीच्या अंगावरून गेले. या अपघातात ज्ञानेश्वरी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.