करमाळा : करमाळ्यासह जिल्ह्यात 5 ठिकाणी विजा कोसळल्याच्या धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.7) मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. तसेच दोन कारखान्यांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आमसिध्द अमृत गायकवाड (वय 64, गुर्देहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर ), बिळेणी नागप्पा डचके (वय 48, वळसंग. ता. दक्षिण सोलापूर ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर शंकर राठोड (वय 67, दोड्डी ता. दक्षिण सोलापूर) हे गंभीर जखमी आहेत. तर करमाळा येथील सचिन अरूण कानगुडे व सोलापूर सुरेश अंबुरे यांच्या कारखान्यांवर वीज पडल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्या घटनेत आमसिध्द गायकवाड हे गुर्देहळ्ळी गावच्या शिवारात शेळ्या राखताना त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्या दोन शेळ्याही मृत्युमुखी पडल्या.
दुसऱ्या घटनेत, बिळेणी डचके हे वळसंग येथून दुचाकीवर कुंभारीत घराकडे चालले होते. तेव्हा वाटेत विजेचा जोरदार कडकडाट होऊन जवळच वीज कोसळली. तेव्हा घाबरलेले डचके हे चालत्या दुचाकीवरून कोसळले. आणि बेशुध्द पडले. त्यांना रूग्णालयात उपचारासाठी करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे घोषित केले. वीज कोसळताना घाबरून हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिका-यांनी काढला.
तिसऱ्या घटनेत, दोड्डी येथील शंकर राठोड यांच्या अंगावर वीज कोसळली. यात राठोड हे गंभीर भाजून जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरु आहेत. चौथ्या घटनेत, सुरेश अंबुरे यांचे सोलापूर शहरातील कोंडानगर परिसरात टॉवेल शिलाई कारखान्याचे गोदाम आहे. या गोदामावर वीज कोसळून त्यात लाखो रूपयांचे नुकसान झाले. तर देवळाली (ता. हवेली) येथे सचिन कानगुडे यांच्या मालकीच्या टायर रिमोल्डींग कारखान्यावर वीज कोसळली आहे. त्यात कानगुडे यांचे खूप मोठे नुकसान झाले.
दरम्यान, या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ दूर होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर करमाळा व बार्शीसारख्या भागात पावसाचा जोर दिसून येतो. जिल्ह्यात सर्वत्रच ओढे-नालेही भरून वाहू लागले आहेत.