पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात नागरिकांना असह्य उकाडा सहन करावा लागत होता. मात्र आज पावसाचे आगमन झाल्यामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकतो. राज्यात अखेर पावसाचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रासह अन्य जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे.
राज्यात मान्सून दाखल झाला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरात शनिवारी तर पुणे शहरात देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान नवी मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. जुईनगर, वाशी, घणसोली परिसरात ढगाळ वातावरण असून पहाटे पासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मान्सून पुढील 48 तासांत मुंबईमध्ये दाखल होणार आहे. तर सिंधुदुर्गाला आज ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान पुढील तीन-चार दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून त्यासोबतच सरासरी 50-60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.