ओमकार भोरडे
शिरुर (पुणे ): येथील जैन मंदीराच्या चोरी प्रकरणात शिरुर पोलिसांनी आरोपींना ठाण्यातील तळोजा कारागृहातून तपासाकामी शिरुर येथे आणले होते. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींना पुन्हा तळोजा कारागृहात घेऊन जात असताना तीन आरोपींपैकी एक आरोपी असलेला मुजाहीद गुलजार खान (रा.कारेगाव, ता. शिरुर, मुळ रा. झारखंड) हा तळोजा कारागृहाजवळून शिरुर पोलिसांना हिसका देऊन फरार झाला होता.
काही दिवसांपुर्वीच घरफोडया, मंदीर चोऱ्यांमध्ये रबाळे पोलिसांनी या आरोपींना जेरबंद केले होते. शिरुरसह संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचे चोरट्यांनी कबुल केले होते. तपासकामी त्यांना शिरुरला आणले होते. शिरुर पोलिसांनी तपास केल्यानंतर ५ जून रोजी आरोपींना पुन्हा तळोजा कारागृहात हजर करण्याकामी शिरुर पोलिस घेऊन गेले निघाले होते. यामधील आरोपी मुजाहीद गुलजार खान याने तळोजा कारागृहाजवळ पोटात दुखत असल्याचे नाटक केले. त्यानंतर त्याने पोलिसांना झटका देत त्या ठिकाणावरून पळ काढला होता. शिरुर पोलिसांसह, क्राईम ब्रँचचे पथक त्याचा शोध घेत होते. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर खान याला बेलापूर पंचशील परिसरातून कैद करण्यात यश मिळाले आहे.