नाशिक : शहरासह जिल्ह्यात असह्य उकाड्यानंतर शहर व जिल्ह्यातील काही भागात मृग नक्षत्राच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे सायंकाळनंतर वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. पुढील पाच दिवसांचा अंदाज लक्षात घेता ८ ते १२ जूनदरम्यान जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच, हवामान कोरडे व दमट राहण्याची शक्यता राहील, असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्राने वर्तविला आहे.
शुक्रवारी (दि. ७) नाशिक शहरात किमान तापमान २५.३ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३७.२ अंश सेल्सिअस आणि रात्रीची आर्द्रता ७५ टक्के व दिवसाची आर्द्रता ९८ टक्के अशी रेकॉर्ड ब्रेक नोंदविली गेली. तापमानाचा पारा चाळिशीच्या आत असला तरी दिवसा व रात्री हवेतील आर्द्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शहर व जिल्हावासीयांना उकाड्याचा त्रास जाणवत आहे.
दिवसभराच्या असह्य उकाड्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने शहराच्या काही भागात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. हवामानाचा अंदाज आणि इशारा लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील काही भागात १० जूनच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात, हलका ते मध्यम पाऊस व सोबत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.