सातारा : पुण्यामधील कल्याणीनगर भागात दारूच्या नशेत गाडी चालवत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवालचा महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेलमधील बार सील करण्यात आल्यानंतर आता एमपीजी क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनियमितता आढळल्यास बुलडोझर चालवा. असे आदेश दिले होते. त्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
सुरेंद्र अगरवालच्या मालकीच्या बारमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सुद्धा सील केला होता. अग्रवाल कुटुंबीयांच्या मालकीचे महाबळेश्वरमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल सरकारी जमिनीवर बेकायदेशीर असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अनियमितता असेल तर त्या हॉटेलवर बुलडोझर चालवा, असा थेट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता.
सुरेंद्र अग्रवालवर काय आहेत आरोप ?
दबाव टाकणे, चालकाला डांबून ठेवणं, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. जेव्हा अपघात घडला तेव्हा सुरेंद्र अग्रवालने आपल्या नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. गाडी तू चालवत असल्याचे पोलिसांना सांग असे त्याने ड्रायव्हरला धमकावून सांगितले होते. तसेच ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप सुद्धा सुरेंद्र अग्रवालवर आहे.
परवाना रद्द
सुरेंद्रकुमारच्या नावे असलेल्या महाबळेश्वरमधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलवर धाड टाकल्यानंतर ही कारवाई केली होती. या प्रकरणाचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बार सील करण्याचा आदेश दिला होता.