PM Narendra Modi : आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख आणि वेळ दोन्हीही ठरलं आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाली.
नरेंद्र मोदी यांचा येत्या 9 जूनला म्हणजे रविवारी सायंकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा होईल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील. मोदींची ही पाच वर्षे मोदी 3.0 म्हणून ओळखली जातील. आज संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली. एनडीएच्या खासदार, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्याची अपेक्षा आहे, मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन देण्याची शक्यता आहे.