नाशिक: राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच गरम होत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (दि. ७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, अर्ज शेवटच्या दिवशी जोरदार राडा झाला आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. तर1 जुलै रोजी मतमोजणी आहे. आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीकडून शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महायुतीकडून शिवसेना पक्षाकडून किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
किशोर दराडेंकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप
परंतु, या निवडणुकीत किशोर दराडे नावाचे अपक्ष उमेदवार देखील निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आणि त्यांच्या समर्थकांआणि अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना मारहाण झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना माघार घेण्यासाठी महायुतीचे किशोर दराडे यांनी दबाव टाकल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.
अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी शर्टचे बटन तोडल्याचे मान्य केले आहे. मात्र, कोणी धक्काबुक्की आणि मारहाण केली हेआपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. पोलीस संरक्षणात किशोर दराडे यांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तर मी कोणावर ही दबाव टाकला नाही, उलट कोल्हे यांच्याच लोकांनी मारहाण केली असल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी केला आहे. या राड्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महसूल आयुक्त कार्यालयात शिवसेना व ठाकरे गट आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही गटाने एकमेकासमोर घोषणाबाजी केल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.